Tuesday, 27 February 2018

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच, उद्धव ठाकरे यांची गर्जना

‘छत्रपतींचा आशिर्वाद चला देऊ मोदींना साथ, अशी घोषणा देत ते सत्तेत आले आणि निवडणुकीनंतर छत्रपतींविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलायला लागले. त्यांना सत्तेची मस्ती चढली आहे.’ असा सणसणीत टोला, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावलाय. पारनेरमध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. ‘जसा पक्ष तसा त्याचा प्रतिनिधी असतो. केंद्र सरकार लोकांचे प्रश्न सोडवायला तयार नाही. अच्छे दिन आले नाहीत. शेतक-यांची वाट लावली. जिल्हा सहकारी बँकांना हे सरकार टाळे लावायला निघाले आहे. आज बँका ओरबाडून ते पळून जात आहेत. पण सरकार काहीच करीत नाही. म्हणून यापुढे त्यांच्यासोबत युती केली जाणार नाही. आपण स्वबळावर पुढील निवडणुका लढणार आहोत. महाराष्ट्र मला भगवेमय झालेला पहायचाय. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, अशी गर्जना त्यांनी यावेळी केली. बँक घोटाळा करून पळून जायचं ही सद्य संस्कृती झाली आहे, असा टोला लगावत त्यांनी सरकारच्या कारभारावर निशाणा साधला आहे. डल्ला मारून, बँक घोटाळे कराचे, हे आमची वृत्ती नाही. एकदा नाव गेले की पुन्हा किर्ती येत नाही हे आमचे आजोबा सांगायचे ही आठवण आज येते. जनता, शिवसैनिक हीच आमची संपत्ती आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. सरकारला चार वर्षे झाली पण एकतरी प्रश्न त्यांनी सोडवला का, पाकिस्तानला धडा शिकवला का? जिल्हा बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा असतो. त्याच नोटाबंदीनंतर जिल्हा बँकांना टाळे ठोकले. मात्र शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला. निवडणुकीपूर्वी लोकांना लोकांना स्वप्न दाखवलं, पण निवडून दिल्यानंतर अच्छे दिन आले का?, असा खणखणीत सवालही त्यांनी केला. येथील लोकसभा मतदार संघात काय झाले ते आम्ही ऐकले. खासदारांच्या डोळ्यांत मस्ती गेली आहे. शिवरायांबद्दल कशी भाषा वापरली ते साऱ्यांनाच माहीत आहे. आम्ही मात्र शिवरायांचे पाईक आहोत, मनामनात शिवरायांच्याबद्दल आदर आहे, हे निवडणुकीपुरता नाही, असंही ते म्हणाले. हे सेनापती बापट यांचं गाव आहे. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र लढ्याची आठवण येते. या लढ्यात माझे आजोबा शिलेदार होते, असं म्हणत त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या आठवणींना उजाळा दिला.